पाचोरा, (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि युवा नेते श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा व भडगाव तालुक्यात नवीन पदाधिकारी आणि सदस्यांच्या नियुक्त्या नुकत्याच करण्यात आल्या आहेत. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पाचोरा व भडगाव तालुक्यातून १ लाख नवीन सभासद नोंदणी करण्याचा निर्धार आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवालय या शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, सुनील पाटील आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात पक्ष वाढीसाठी पदाधिकारी नियुक्त्या आणि नवीन सभासद नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा व भडगाव शहर आणि तालुक्यात पदाधिकारी आणि सदस्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसेच, येत्या महिन्याभरात पाचोरा व भडगाव तालुक्यातून १ लाख नवीन सभासद नोंदणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे. भारतीय जवानांचे शौर्य कौतुकास्पद असून, त्यांचे मनोबल अधिक मजबूत करण्यासाठी २५ मे रोजी पाचोरा शहरातून सर्वपक्षीय आणि नागरिकांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणाही आमदार किशोर पाटील यांनी केली. पाचोरा व भडगाव तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. नवीन नियुक्त्या आणि सभासद नोंदणीमुळे पक्षाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, ऑपरेशन सिंदूरच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी आयोजित तिरंगा रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.