जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मीनाताई ठाकरे संकुल परिसरात मित्राचा वाढदिवस साजरा होत असताना जुन्या वादातून एका तरूणावर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजता घडली. यात महेंद्र समाधान सपकाळे उर्फ दादू (वय २५ रा. पिंप्राळा हुडको) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शहरातील मीनाताई ठाकरे संकुल परिसरात रात्री दहाच्या सुमारास महेंद्र सपकाळे सह इतर मित्र सचिन चौधरी याचा वाढदिवस साजरा करत होते. दरम्यान चार ते पाच जण मोटरसायकलवर येऊन त्यांनी महिंद्र व त्याचा मित्र सचिन याला मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना आलेल्या तरुणांमधून एकाने गावठी बंदुकीतून बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात महेंद्र याच्या कमरेखाली गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला.
यानंतर झालेल्या धावपळीत महेंद्र यांने एका घरात घुसून आपला जीव वाचवला. दरम्यान हल्ला करणारे तरुण घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशन चे पथक घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, रामानंदनगर आणि जिल्हा पेठ पोलिसांनी जखमीची विचारपूस करत घटनेची चौकशी केली असता जखमी महेंद्र सपकाळे याने विशाल व बाबू नामक तरुणांनी हल्ला केला असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.