जळगाव, दि. 04 – संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन तर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे गुरूवारी आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात भुपाळीने झाली. घनःशाम सुंदरा, अहिर भैरव रागात बासरीच्या सुरांनी वेणुनादाने दिवाळी पहाट झाली. दिवाळी हा आनंदाचा, उत्सवाचा सण असतो, संगीत व सुरांनी आपण आपलं आयुष्य समृद्ध करावं यासाठी परिवर्तन दरवर्षी दिवाळी पहाटचं आयोजन करत असते.
डॉ.शशिकांत गाजरे, डॉ. रवी महाजन, कवयित्री सुशील पगारिया, रंगकर्मी संदीप घोरपडे, यजुर्वेंद्र महाजन, यांच्या हस्ते फुलबाजी पेटवून दिवाळी पहाटचं उद्घाटन करण्यात आले. सुप्रसिद्ध बासरी वादक योगेश पाटील यांचे बासरी वादन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी अहिर भैरव राग, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, मीराबाई भजन पायोजी मैने सादर केले. प्रेक्षकांच्या मागणीनुसार हिरो व सैराट सिनेमाच्या धून सादर केल्या. सांगता कबीर दोह्याने झाली.
खान्देशासह महाराष्ट्रभर त्यांनी बासरी वादनाचे कार्यक्रम केले असून उत्तम बासरी वादक कलावंत म्हणून परिचित आहेत. त्यांना तबल्यावर श्रीपाद शिरवळकर (पुणे), किबोर्डवर सागर सपकाळे, तानपुऱ्यावर कल्याणी मोराणकर व बासरी सहाय्यक किर्तेश बाविस्कर या कलावंतांनी साथसंगत केली. रंगकर्मी मंजुषा भिडे यांच्या निवेदनाने मैफिलीत रंगत आणली.
याप्रसंगी रावेरच्या गटविकास अधिकारी दिपा कोतवाल, चित्रकार जितेंद्र सुरळकर, विनोद देशमुख, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, जेष्ठ पत्रकार दिपक पटवे, डॉ मिलींद पाटील, शरद महाजन, शरद पाटील, नारायण बाविस्कर या मान्यवरांनी कलावंतांचा सन्मान केला.
दिवाळीनिमित्त दिवाळी अंकाची वाचन संस्कृती रुजवण्यासाठी
दिवाळी पहाट कार्यक्रमात साप्त.साधना बालकुमार दिवाळी अंकांचे वितरण करण्यात आले. जगप्रसिद्ध सिनेमांची माहिती असलेल्या या विशेष दिवाळी अकांचे वितरण उपस्थित मुलांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाऊंच्या उद्यानातील अॅम्फी थिएटर संपूर्ण भरलेले होते. जागे अभावी अनेकांना निराश होत परत जावे लागले. या कार्यक्रमासाठी भवरलाल अँड कांताबाई फाऊंडेशनचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी मंगेश कुलकर्णी, सतीश सुर्वे, डॉ किशोर पवार, प्रतिक्षा कल्पराज, मनोज पाटील, मोना निंबाळकर, मिलिंद जंगम, सुनिला भोलाने, हर्षदा पाटील, सुनील बारीबारी आदींनी मेेहनत घेतली.