जळगाव, (प्रतिनिधी) : मध्यरात्री घराला कुलुप लावून कुटुंब नातेवाईकांकडे बऱ्हाणपूरकडे मार्गस्थ होताच चोरट्यांनी कुलुप कोयंडा तोडत घरातील रोकड, सोने चांदीचे दागिनेसह सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवार दि. १७ रोजी शहरात पहाटे तांबापुरात घडली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
शेख जब्बार शेख करीम (वय ५५) हे कुटुंबासह तांबापुर परिसरात वास्तव्यास आहेत. ते शालेय पुस्तकांची विक्री करतात. तसेच भंगार साहित्य वस्तू खरेदी करतात. शेख कुटुंब गुरुवारी मध्यरात्रीनंतर घराला कुलुप लावून बऱ्हाणपूर येथे नातेवाईकांकडे गेले होते. शुक्रवार दि. १७ रोजी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा आणि कुलुप तोडल्याचा प्रकार शेजारचांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ संपर्क साधून या घटनेची माहिती शेख जब्बार यांना दिली. खबर कळताच एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली. श्वान पथकासह फिंगर प्रिंट तज्ञ दाखल झाले.
शेख कुटुंब तत्काळ जळगावात दाखल झाले. शेख जब्बार यांच्या म्हणण्यानुसार ७ लाख ३०हजार रोकड तसेच सोन्याचांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. शेख यांच्याकडे लग्नाचे नियोजन सुरु होते. त्यानुसार त्यांनी दागिने व रोकड जमवाजमव केली होती.