११ मतदारसंघात महायुतीचेच ठरले वर्चस्व
जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे महायुतीने सर्व ११ जागा जिंकत आपले वर्चस्व राखले आहे. महाविकास आघाडीला जिल्ह्यात खातेही उघडता आले नाही. कॉंग्रेसकडे असलेली रावेरची जागाही हातून गेली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा या ठिकाणी पुन्हा विद्यमान आमदारांना मतदारांनी संधी दिली आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वच ठिकाणी युतीचा झेंडा फडकला आहे.
मतमोजणीला सकाळी साडेआठ वाजेता प्रारंभ झाल्यानंतर सुरूवातीपासूनच युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम दिसून आली. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण व शिवसेना (उबाठा) गटाचे उन्मेश पाटील यांच्यात लढत झाली. यात मंगेश चव्हाण यांनी विजय नोंदविला. तर जळगाव ग्रामीणमध्ये आजी- माजी पालकमंत्र्यांमध्ये मुख्य लढत झाली. यात शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला.
राज्याचे लक्ष लागलेल्या जामनेर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांनी आपला बालेकिल्ला अबाधित ठेवत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप खोडपे सर यांचा पराभव केला. मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या कन्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार रोहिणी खडसे यांचा पराभव केला. तर पाचोरा येथील लक्षवेधी लढतीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर पाटील यांनी अपक्ष उमेदवार अमोल शिंदे व उबाठाच्या वैशाली सुर्यवंशी यांचा पराभव केला.
चोपड्यात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत सोनवणे व उबाठा गटाचे प्रभाकर सोनवणे यांच्यात सरळ लढत होऊन चंद्रकांत सोनवणे यांनी विजयश्री खेचून आणला. रावेरमध्ये भाजपचे अमोल जावळे यांनी काँग्रेसचे धनंजय चौधरी यांना आस्मान दाखवित कॉंग्रेसकडे असलेली एकमेव जागा खेचून आणली. भुसावळमध्ये पुन्हा भाजपचे संजय सावकारे यांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे डॉ. राजेश मानवतकर यांचा पराभव केला. जळगाव शहर मतदारसंघात भाजपाचे सुरेश भोळे यांनी जिल्ह्यात सर्वाधिक लीड घेत विजय नोंदविला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री सुनील महाजन यांचा पराभव केला. अमळनेरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील यांनी अपक्ष व माजी आ. शिरीष चौधरी, काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे यांना पराभूत केले. पारोळा-एरंडोलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांनी माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांचा दारूण पराभव केला.
जिल्ह्यात दोन जणांना पहिल्यांदा आमदारकीचा मान..
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन जणांना पहिल्यांदाच आमदारकीचा मान मिळाला आहे. यात पारोळा एरंडोल मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील आणि रावेर मतदार संघातील भाजपचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांचा समावेश आहे. दरम्यान मतदार संघातील युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात कोणत्या दिग्गजांना बसला फटका?..
जळगाव जिल्ह्यात ग्रामीण मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर, चाळीसगाव येथे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार उमेश पाटील, पारोळ्यात अपक्ष उमेदवार माजी खासदार ए टी पाटील, पाचोर्याचे अपक्ष उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ, अमळनेरचे अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी, मुक्ताईनगर येथे आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे, आणि काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना पराभवाचा फटका बसला आहे.
हाती आलेल्या निकालानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी गुलाल उधळीत जोरदार जल्लोष केला. दरम्यान निवडून आलेले महायुतीचे अकराही उमेदवार मुंबईला रवाना झाले असून सोमवारी दिनांक २५ रोजी वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा पार पडणार आहे.