जळगाव ग्रामीणसाठी सर्वांगीण विकासाचा गुलाबराव पाटील यांचा दृढ संकल्प !
जळगाव / धरणगाव, (प्रतिनिधी) : शिवसेना नेते व महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी आगामी पाच वर्षांसाठी एक ठोस आणि स्वतंत्र विकासाचा वचननामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित केला आहे. या वचननाम्यात मागील वेळेस दिलेल्या वचनांपेक्षा अधिक कार्य केले असून याही वेळेस मोठे प्रकल्पांवर भर देवून शेती रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची कटिबद्धता आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प मांडण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटील यांच्या विकासासाठी घेतलेल्या संकल्पाचे कौतुक केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ग्रामीणचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर गुलाबराव पाटील यांनी सांगितले की “धनुष्यबाणावर विश्वास दाखवून संधी द्या. हा वचननामा फक्त आश्वासन नाही, तर विकासाचा दृढ संकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी विशेष योजना आखण्यात आली असून शेती रस्त्यांचे डांबरीकरण, सौर ऊर्जा प्रकल्पाला गती देऊन त्यांना आधुनिक सुविधा पुरविण्यासाठी शेतीसाठी सलग वीजपुरवठा, गरजू शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना चालूच ठेवून महिला सशक्तीकरणाला विशेष प्राधान्य देत बचत गट भवन उभारणी, महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन यासारख्या योजना राबवल्या जाणार आहेत. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी टेक्स्टाईल पार्क, सहकारी सूत गिरणी, आणि विविध प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन, शिक्षण क्षेत्रात डिजिटल शाळांचे रुपांतर आणि स्पर्धा परीक्षा केंद्रांची स्थापना करून विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा पुरविण्याचा संकल्प वचननाम्यात करण्यात आला आहे.
प्रमुख विकास प्रकल्प..
शेती रस्ते डांबरीकरणाला प्राध्यान्य, आसोदा – भादली परिसरात यशस्वी झालेली बंदिस्त पाईपलाईन योजना धरणगाव तालूक्यातही राबविणार, सुरु असलेल्या बालकवी ठोंबरे आणि बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकांना गती, धरणगाव रिंगरोड आणि पाळधी उड्डाणपूल, सर्व सुविधायुक्त बसस्थानकांची निर्मिती, मोठ्या पाझर तलाव निर्मिती आणि सिंचन प्रकल्पांचा विकास व शिरसोली परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प व सुतगिरणीचाही समावेश आहे. बचत गट भवन उभारणी, उर्वरित ग्रामपंचायत कार्यालय इमारती, धरणगाव येथे बाळासाहेब ठाकरे उद्यानचा समावेश आहे.