विजय बाविस्कर | पाचोरा, (प्रतिनिधी) : मतदार संघासह पाचोरा शहराचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आमदार किशोर पाटील म्हणजे विकास असे जुणू समीकरण असल्याचे मत माजी नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी व्यक्त केले आहे. पाचोरा शहर हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात गतीने विकसित होणारे शहर बनले असून ते विकासाचे एक मॉडेल ठरेल असा दृष्टिकोन समोर ठेवून आ. किशोर आप्पा पाटील यांच्या दूरदृष्टीने आम्ही शहराला देखणं रूप देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माजी नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी सांगितले.
शहरातील रस्ते डीपीआर साठी १४६ कोटी..
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विस्तारणारे शहर म्हणून पाचोरा शहराची ओळख निर्माण झाली आहे. नगरपरिषद हद्दीतील व नव्याने विस्तारलेल्या शहरातील कॉलनी व वस्ती भागातील रस्त्यांची काँक्रिटीकरण करण्यासाठी पाचोरा नगर परिषदेच्या माध्यमातून दोन टप्प्यात निधी मंजूर करण्यात आला. यात पहिल्या टप्प्यातील ४२ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून नुकताच पुन्हा १०४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून या कामांना देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे फक्त शहर हद्दीतील कॉलनी भागातील रस्त्यांसाठी तब्बल एकूण १४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामामुळे शहराला नवीन आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे.
पायाभूत सुविधा सोबतच शहरातील व्यापार वृद्धीसाठी व व्यापार करणाऱ्या उद्योजक व व्यापारी बांधवांसाठी हक्काची जागा असावी या भावनेतून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून पाच कोटी रुपये खर्चाचे स्वर्गीय तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्या नावाने भव्य व्यापारी भवन उभारले असून यामुळे व्यापारी बांधवांची वर्षानुवर्ष असलेली मागणी पूर्णत्वास नेऊन व्यापारी बांधवांच्या सुख सोयीसह शहराच्या सौंदर्यकरणात देखील या टुमदार इमारतीने भर घातला आहे.
पाचोरा शहरातील हिवरा नदीवरील उपयुक्त पुलांची निर्मिती..
पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या हिवरा नदीवरील अतिशय कमी उंचीच्या जून्या पुलामुळे पावसाळ्यात पाचोरा शहर आणि कृष्णापुरीकडील भागाचा संपर्क सतत तुटलेला असायचा. दळणवळण व व्यापारावर याचा गंभीर परिणाम होत असे. विद्यमान आमदारांनी २० कोटी रुपये निधीतून कृष्णापुरीचा पूल, पांचाळेश्वर पूल तसेच स्मशानभूमी शेजारील पूल अशा तब्बल तीन पुलांची निर्मिती करण्यात आली.
पाचोरा शहरातील सुसज्ज व्यापारी संकुल आणि भाजी मंडईची निर्मिती..
पाचोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पूर्वी असलेल्या भाजी मंडई च्या परिसरात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. पावसाळ्यात तर भाजी बाजारात चालने सुध्दा अवघड होते. आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून कै.बापूसाहेब के एम पाटील व्यापारी संकुल प्रत्यक्षात आकाराला आले आहे. या व्यापारी संकुलाच्या ग्राउंड फ्लोअरला भाजी मंडई निर्माण करण्यात आली असून त्यामुळे भाजीपाला विक्रेत्या व्यापारी बांधवांचे ऊन वाऱ्यापासून संरक्षण झाले असून त्यांच्या भाजीपाला विक्री व्यवसायाची कायम स्वरुपी सोय झाली आहे.
वारकरी भवन निर्मिती..
पांडुरंगाच्या भक्तीचा वारसा लाभलेल्या घरण्यातून आलेल्या आप्पासाहेबांनी मतदार संघाचा चौफेर विकास साधत असतानाच अध्यात्मिक सेवा करणाऱ्या कीर्तनकार भजनी मंडळातील साधकांच्या सेवेसाठी तब्बल ५ कोटी रुपये खर्चाचे वारकरी भवन मंजुर केले आहे. लवकरच त्याचे काम सुरू होणार असून या माध्यमातून वारकरी संप्रदायातील भाविकांची सेवा आमदार किशोर आप्पा यांच्या माध्यमातून घडणार असल्याने ते एक सेव व्रती म्हणून समोर आले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय..
मतदार संघातील जनतेसाठी सुमारे १७ कोटी रुपये खर्चाचे उपजिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ग्रामीण रुग्णालयाचे आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर होणार आहे. सुसज्ज अशा उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व फॅकल्टीजचे डॉक्टर असणार आहेत. येत्या काळात पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या रुग्णांना जळगाव,धुळे, छत्रपती संभाजी नगर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सर्व सुविधायुक्त आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार असून याचा गरजू रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.
श्रीराम मंदिर परिसराच्या विकासामुळे पाचोरा शहराचे रूपड पालटणार..
शहरातील सुमारे साडेतीनशे वर्षांचा प्राचीन इतिहास असलेल्या साधू परंपरेतील श्रीराम मंदिर परीसराचा वैशिष्ठ्यपूर्ण योजनेतून पर्यटन विकासासाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील झाली आहे. यामुळे पाचोरा शहराच्या पर्यटन वृद्धीला नवचालना मिळणार आहे.
काकनबर्डी टेकडीचा विकास..
सुमारे ५ कोटी रुपये खर्चून काकनबर्डी परिसराचा विकास करण्याचे काम सुरू आहे. पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेल्या या टेकडीवर वाहन घेऊन जाणे हेच खूप मोठे आव्हान होते. परंतु आ. किशोर आप्पांच्या प्रयत्नांमुळे येथे रस्ता,घाट, सेल्फी पॉइंट तसेच येणाऱ्या भाविकांसाठी सभा मंडप ही बांधण्यात येणार आहे. यामुळे शहरातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
ओपन स्पेस निर्मितीने शहरवासीयांची झाली सोय..
पाचोरा शहरात सुमारे अडीचशे ओपन स्पेस ची निर्मिती करत कॉलनी वासीयांची सोय करून दिली आहे. या ठिकाणी होणारे लहान मोठे कार्यक्रमांमुळे जनतेत समाधानाचे वातावरण असते. नगर परिषदेच्या माध्यमातून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.