जळगाव, (प्रतिनिधी) : विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात विकास हाच आमचा धर्म असल्याची जाहिरात महायुतीच्या उमेदवाराकडून सध्या केली जात आहे. मात्र, त्यांनी गेल्या काही वर्षात फक्त दोन नंबरवाल्यांचा विकास केला आहे, अशी टीका माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली. ग्रामीण भागातील रस्ते तीनवेळा तयार करूनही त्यावरील खड्डे कायम आहेत. मग कोट्यवधींचा निधी गेला तरी कुठे, असा सवाल देखील माजी मंत्री देवकर यांनी उपस्थित केला.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री श्री.देवकर यांनी महायुतीचे प्रतिस्पर्धी उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर तोफ डागली. विकासाची कोणतीही दृष्टी नसलेल्या नेतृत्वामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघ पिछाडीवर पडला आहे. स्वतःला पाणीवाला बाबा म्हणणाऱ्यांनी धरणगावकरांचे पाण्यासाठी हाल केले आहेत. करोडो रूपये खर्चुनही आज धरणगावात १५ दिवसाआड अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. नशिराबाद, असोदा, ममुराबाद, शिरसोली येथेही तीच परिस्थिती आहे. मी पाणीपुरवठा मंत्री असतो तर धरणगावला दररोज पाणी दिले असले, असे माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले.
मंत्र्याचे ठोस काम दाखवा १ लाख रूपये देईन..
मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीणच्या विकासाचा दावा करतात. त्यांनी १० वर्षात काय केले, ते समोर येऊन सांगावे. त्यापेक्षा एक ठोस काम दाखवून द्यावे, मी त्यांना १ लाख रूपये देण्यास तयार आहे. मात्र, ते कधीच ठोस काम दाखवू शकणार नाहीत. असे गुलाबराव देवकर यांनी बोलताना सांगितले.