जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील उमाळा शिवारात कंडारी फाट्याजवळील ईश्वर पल्प आणि पेपर मिल कंपनीतून मशीनरी साहित्य लांबविल्याची घटना २४ ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर मध्यरात्री शेतातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
श्याम जनार्दन बिऱ्हाडे (वय-२७, रा. उमाळा ता.जि.जळगाव) असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारातील कंडारी फाट्याजवळ भवानजी विश्रामभाई पटेल वय-६४, रा. शिवराम नगर जळगाव यांचे ईश्वर पल्प आणि पेपर मिल्क नावाची कंपनी आहे. दरम्यान २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या फॅक्टरीमधून ६५ हजार रुपये किमतीचे मशिनरी कामी लागणारे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली होती. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान या गुन्ह्याचा शोध सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे हेडकॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर आणि गणेश ठाकरे यांना माहिती मिळाली. संशयित आरोपी हा उमाळा शिवारातील शेतातील गोठ्यात झोपलेला असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी, दत्तात्रय बडगुजर, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर, गणेश ठाकरे, अफजल बागवान यांनी कारवाई करत संशयित आरोपी श्याम बिऱ्हाडे याला मध्यरात्री अटक केली आहे.
त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास मुकुंद पाटील हे करीत आहे.